May 25, 2011

भद्रा राष्ट्रीय उद्यान : एक दुर्लक्षित व्याघ्र प्रकल्प

पश्चिम घाट, निसर्गाने भारताला दिलेले एक वरदान आहे. भारताच्या पश्चिमेला गुजरात पासून ते केरळ पर्यंत १६०० कि मी पसरलेली हि पर्वतरांग जगातील मोजक्या बायो डायव्हरसीटी हॉट स्पॉट पैकी एक आहे. पश्चिम घाटात अनेक असे प्राणी आहेत कि जे फक्त इथेच सापडतात आणि जगात इतरत्र कुठे नाही आणि या मुळेच पश्चिम घाटात असलेल्या विविध अभयारण्यांचे अतिशय महत्व आहे. भद्रा राष्ट्रीय उद्यान हे पश्चिम घाटातले असेच एक खास जंगल आहे.

कर्नाटकातील प्रसिद्ध तुंग व भद्रा या दोन नद्यांपैकी भद्रा या नदी च्या खोर्यामध्ये भद्रा राष्ट्रीय उद्यान वसलेले आहे. मध्यभागी भद्रा नदी चे खोरे आणि आजूबाजूने मुल्लैन्गिरी, हेब्बेगिरी, गंगेगिरी व बाबाबुन्दागिरी या पर्वतरांगा यांमध्ये अंदाजे ४९५ वर्ग कि मी परिसरात भद्रा चे जंगल पसरलेले आहे. परिसराची सर्वसाधारण उंची ७५० मी ते २१०० मी अशी असून कल्लाहाथीगिरी नावाचे १६७५ मी उंचीचे शिखर व हेब्बेगिरी नावाचे अंदाजे १८७६ मी उंचीचे शिखर हे अभयारण्य परिसरातील सर्वात उंच शिखरे आहेत. भद्रा नदीच्या अंदाजे २००० वर्ग कि मी जलसंधारणाच्या क्षेत्रफळापैकी एक चतुर्थांश क्षेत्र भद्रा अभयारण्याचे आहे. कर्नाटकातील लाखो लोकांची तहान व शेती या परिसरात पडणार्या पावसावर अवलंबून आहे.

भद्रा राष्ट्रीय उद्यानाचा १९९८ साली प्रोजेक्ट टायगर मध्ये २५ वा व्याघ्र प्रकल्प म्हणून समाविष्ट केला गेला. कमी जास्त होत होत आज अंदाजे ३० वाघ या अभयारण्यात आहेत. या जंगलाचे वैशिष्ठ्य म्हणजे हे जंगल फक्त वाघांसाठी प्रसिद्ध नसून हत्तींसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. ३० वाघांसोबत या जंगलात अंदाजे २०० हत्ती सुद्धा आढळून येतात. तसेच साधारण २० बिबटे, १८० गवे अन ५०० हून अधिक चितळ व सांबर या जंगलात नोदावले गेले आहेत. अस्वल, मलबारी शेकरू, पिसोरी हरीण, उडती खार असे काही इतर प्राणी सुद्धा सापडतात. अभयारण्य परिसरात अंदाजे ३५० पक्षी नोंदवले गेले आहेत. त्यातील काही फक्त पश्चिम घाटात आढळणारे असे आहेत. उत्तम वर्षावन असल्यामुळे येथे सापांच्या अनेक प्रजाती सापडतात व त्यांची संख्या सुद्धा भरपूर आहे. तसेच त्यांना खाऊन जगणारा नागराज किंवा किंग कोब्रा सुद्धा या जंगलात सापडतो. ह्या जंगलात १२० प्रकारचे वृक्ष प्रकार नोंदवले गेले आहेत त्यात प्रामुख्याने साग, किन्दल, माथी, होने, जांभूळ, आंबा या प्रकारची झाडे आहेत. या जंगलाचे अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे उंचावरचा भागामध्ये थोड्या प्रमाणात शोला पद्धतीचे जंगल सुद्धा पहावयास मिळते.

भद्रा ला पोहोचण्याकरिता शिमोगा चिकमंगळूर या दोन शहरांमधून जाता येते. शिमोगा वरून दक्षिण पश्चिमेला अन्द्दजे ४० कि मी वर भद्रा वरील धरणाची भिंत लागते. ह्याचा मागील बाजूने जंगल परिसर सुरु होतो. पण ह्या परिसरात सपाट प्रदेश अजिबात नसून फिरणे खूप कष्टदायक आहे. म्हणून निसर्गप्रेमी सहसा चिकमंगळूर वरून जाणे पसंत करतात. चिकमंगळूर वरून ३८ कि मी उत्तर पश्चिमेला जंगल सुरु होते. तेथूनच पुढे मुथोडी नावाच्या जागी कर्नाटक वनविभागाने रहाण्याची सोय केली आहे. कर्नाटक वनविभागाशी संपर्क साधून , पूर्व परवानगी घेऊन येथे रहाण्याची सोय होऊ शकते. जंगलामध्ये फिरण्याकरिता वनविभागाने जंगलाच्या विविध भागांमध्ये कच्चे रस्ते केले आहेत. आपली गाडी घेऊन जंगलातून फिरता येते. पण त्या करीन सोबत वनविभागाचा गार्ड असणे गरजेचे आहे. हे जंगल व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे ह्या जंगलात पायी फिरण्यास परवानगी नाही. तसेच जंगलात हत्ती असल्यामुळे ते सुरक्षितही नाही.

हे जंगल मार्च ते मे या काळात बंद असते. जून ते सप्टेंबर या काळात भरपूर पाउस असतो. या काळात तुम्ही जंगलात जाऊ शकता पण ते कष्टदायक असते. खालून जळवा व वरून बेदम पाउस अशी स्थिती असते. या काळात सरीसृप व उभयचर प्राण्यांच्या अभ्यासासाठी जावे. नाहीतर या जंगलाचा सर्वोत्तम काल ऑक्टोबर ते फेब्रुवारी असा आहे. जंगलात फिरताना पटापट काही दिसेल अशी अपेक्षा ठेऊन जाऊ नये. सदाहरित व घनदाट जंगल असल्यामुळे प्राणी, अगदी हत्ती सुद्धा सहजतेने लपून जातो. पण जे जे समोर येईल ते बघत राहावे. नीट बघायला सुरु केल्यास मुंगी पासून हत्ती पर्यंत सर्वच गोष्टी थरारक वाटतील.

शाळेत असताना आपण सर्वजण एक प्रतिज्ञा म्हणतो "भारत माझा देश आहे" त्यातील एक ओळ आहे ती थोडीशी बदलून म्हणावसं वाटतं " भारतातील विविधतेने नटलेल्या जंगल संपदेचा मला अभिमान आहे , या समृद्धतेच्या वारसाची पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन"

- Pinakin Karve

Published in Ma Ta,
Friday 27th 2011

1 comment: