May 10, 2011

बोंडला अभयारण्य

एक काळ असा होता कि भारत देश हा वाघ आणि गारुड्यांचा (snake charmers) देश म्हणून ओळखला जायचा. खूप मोठ्या प्रमाणात आणि विविध प्रकारची जंगले यामुळे भारतात प्रचंड प्रमाणात जैववैविध्य वसत होते. गेल्या शंभर - दोनशे वर्षांचा विचार केल्यास ह्याचा प्रचंड प्रमाणात ह्रास झाला आहे. तरीपण आज देशाचा विविध भागांमध्ये उत्तम प्रतीचे जंगला टिकून आहे आणि त्यात जुन्या जंगल संपदेचा अंदाज येईल इतपत अजून शिल्लक आहे. अशाच काही खास जागांमध्ये गोव्यातील बोंडला अभयारण्य येते.

अनेकांना गोवा म्हणजे फक्त समुद्रकिनारे असा वाटते पण त्या पलीकडे जाऊन गोवा राज्यामध्ये प्रचंड प्रमाणात जैववैविध्य आढळून येते. जवळ जवळ १००० प्रकारच्या वनस्पती, ४०० प्रकारचे पक्षी, २०० हून अधिक फुलपाखरांचा प्रजाती, ४० हून अधिक सस्तन प्राण्यांच्या प्रजाती, साधारण तेवढ्याच प्रकारचे सरीसृप आणि असंख्य प्रकारचे इतर जीव. एवढे प्रचंड वैभव छोट्याशा गोवा राज्यात सामावले आहे. अर्थात समृद्ध जंगले असल्याशिवाय हे शक्य नाही. बोंडला अभयारण्य अशाच खास जंगलांमध्ये येते.

फक्त ८ वर्ग किमी. मध्ये वसलेल्या ह्या अभयारण्याकडे पणजी बेळगाव रस्त्यावरील पोंडा ह्या गावातून रस्ता जातो. पणजी पासून अंदाजे ४० किमी तर पोंडा गावापासून अंदाजे १० किमी वर ह्या अभयारण्याचे मुख्य ऑफिस आहे. पणजी पासून पोंडाला येण्याकरिता स्थानिक बसेस मिळतात. तसेच पोंडा पासून बोंडला ला पोहोचण्याकरिता खासगी गाड्या भाड्याने मिळू शकतात. बोंडला मध्ये गोवा वन विभागाचे रेस्ट हाउस आहे. सर्व व्यवस्था मिळून अंदाजे ४० ते ५० लोक राहू शकतील अशी व्यवस्था आहे. त्याची पूर्व परवानगी योग्य ते शुल्क भरून गोवा वनविभागाकडून घ्यावी लागते. रेस्ट हाउस पासून थोड्या अंतरावर एक उत्तम प्राणी संग्रहालय आहे. गोव्यात आढळून येणारे काही निवडक प्राणी व विविध प्रकारचे सरीसृप या प्राणी संग्रहालयामध्ये बघायला मिळतात.

बोंडला अभयारण्य हे सदाहरित वन ह्या प्रकारातील असून त्यामध्ये काही वैशिष्ठ्यपूर्ण प्राणी सापडतात. मलबार जायंट स्क्वीरल किंवा मराठीत ज्याला मलबारी शेकरू म्हणतात ते ह्या जंगलामध्ये सहजपणे आढळून येतात. रेस्ट हाउस चा पाठीमागे असलेल्या उंच वृक्षांच्या फांद्यांवर लक्ष ठेवल्यास पटकन दिसून जातो. आजू बाजूला चालत फिरताना चितळ, सांबर, भेकर सारखे प्राणी सहज दिसून जातात. ह्या जंगलामध्ये बिबट्याचा वावर आहे पण घनदाट जंगल असल्यामुळे त्याचे दर्शन अत्यंत दुर्मिळ आहे. एकदा प्राणी संग्रहालयातील मादी बिबट्याच्या वासाने एक नर बिबटा प्राणी संग्रहालयात घुसला होता व ते सांभाळताना वनविभागाची गडबड उडाली होती. ह्या जंगलामध्ये अशा गमती जमती होत असतात. तुम्ही जर रेस्ट हाउस मध्ये मुक्काम केलात तर जेवणाच्या जागेच्या आसपास पहाटे किंवा संध्याकाळी काही रानडुक्करे तुम्हाला घोटाळताना सापडतील. आजकाल जंगलातून दुर्मिळ झालेले पिसोरी हरीण म्हणजेच माउस डियर सुद्धा बोंडला मध्ये सापडते. फक्त ते अत्यंत लाजाळू असल्याकारणाने व फक्त रात्री बाहेर पडत असल्यामुळे बघायला मिळणे अवघड आहे. ओर्नेट फ्लाइंग स्नेक किवा उडता सर्प हा वैशिष्ठ्यपूर्ण व दुर्मिळ असा बिनविषारी साप ह्या जंगलात सापडतो. अंग चपटे करून एका झाडाच्या शेंड्यावरून दुसऱ्या झाडावर ग्लाईड करत जाणे हे ह्या सापाचे वैशिष्ठ्य. एका झेपेत जवळ जवळ ३० ते ५० मीटर अंतर हा साप कापू शकतो. ह्या शिवाय कित्येक प्रकारचे पक्षी व फुलपाखरे ह्यांचे हे अभयारण्य वसतीस्थान आहे.

तुम्ही खरे निसर्गप्रेमी असाल तर हे जंगल तुम्हाला कधीच निराश करणार नाही. कुठलाही ऋतू असो हे जंगल तुम्हाला सतत काहीतरी दाखवत राहील. दुर्बीण, कॅमेरा अशा वस्तू व प्राण्यांची माहिती देणारी विविध फिल्ड गाईड्स घेऊन जर तयारीने तुम्ही ह्या जंगलात शिरलात तर तुम्ही ह्या जंगलाचा अधिक चांगल्या प्रकाराने आनंद घेऊ शकता. गोव्याला जाऊन समुद्रकिनारे प्रत्येकजण बघून येतो. काहीतरी वेगळे करण्याची संधी हे जंगल तुम्हाला देते. तसेच निसर्ग वाचवा नुसते न बोलता जंगलाशी प्रत्यक्ष नाळ जोडल्यास काहीतरी कृती केल्यासारखे होईल.

पिनाकिन कर्वे

Published in MaTa on Friday 11th May 2011

1 comment:

  1. छान माहिती दिली आहेस. Thanks for sharing 

    ReplyDelete