May 9, 2011

बिन भिंतीची उघडी शाळा

आजकाल पेपरात अनेकदा विविध किल्ल्यांवर हरवलेल्या लोकांच्या बातम्या वाचतो. अनेकांना हे काहीतरी भयंकर घडले असे वाटते. पण प्रत्यक्षात तुम्ही कुठल्याही मुरलेल्या ट्रेकर ला विचाराल तर तो एकदाही हरवलेला नाही असे कधीच होत नाही. त्याने कधीच कोणाला फोन करून वाचवायला बोलावलेले नसते. ह्यामध्ये त्याचा वाट पाठ असतात असे नव्हे पण महत्वाचे असते ते म्हणजे परिस्थितीचे आकलन करून डोकं शांत ठेऊन बरोबर वाट शोधून काढण्याची कला येणे. ही काही वर्गात शिकवून येणारी किंवा एका दिवसात कळणारी गोष्ट नव्हे. त्याकरता सातत्याने विविध ठिकाणी भटकंती करून अनुभवांची शिदोरी गोळा करणे गरजेचे आहे. आपल्यापेक्षा मोठ्या लोकांचे अनुभव ऐकून त्यातुक शिकणे गरजेचे आहे. आज आमच्या सारखी जी लोक व्यवसाय म्हणून साहसी भटकंती या क्षेत्रात काम करतो ते सर्व विविध अनुभवातून शिकूनच शहाणे झालेले असतात. माझ्या जडणघडणीत ज्या एका ट्रेक ने महत्वाची भर घातली त्याचा हा अनुभव.

अनेकदा एखाद्या गडाचे नाव ऐकून तेथे जावेसे वाटते आणि केवळ ऐकीव माहितीवर जायला सुरुवात करतो. अशा वेळी पुढील घटनांची आपणांस कल्पना नसते आणि पर्वाही नसते. आम्ही मोठ्या उत्साहात जीवधन-नाणेघाट-भैरवगड अशा तीन दिवसाच्या ट्रेकसाठी निघालो होतो. थेट बस ची वेळ नीट माहिती नसल्यामुळे प्रवासाची सुरुवातच बस चुकण्याने झाली. तरीपण डगमगता शिवाजीनगर-नारायणगाव-जुन्नर-घाटघर अशा तीन एस.टी. मधून प्रवास करून एकदाचे जीवधन गडाच्या पायथ्याशी पोहोचलो.

वाटाड्यांना वाटेस लाऊन आम्ही आत्मविश्वासाने चढाई सुरु केली. गडाची वाट ओढ्यातून जाते हे माहित असल्याने प्रथम ओढ्याचा शोध सुरु केला.येथून आमच्या अडचणींना सुरुवात झाली. बऱ्याच वेळाने गर्द झाडीतील एक ओढा निश्चित करून गड चढू लागलो.काही वेळाने आम्ही अशा ठिकाणी आलो जिथे गर्द झाडीने आमचा रस्ता रोखला. नंतर शोधाशोध करून आम्ही एका खड्या चढापाशी आलो. तो चढून आम्ही अशा चढापाशी आलो जेथून परतणे शक्य नव्हते आणि पुढचा मार्गही सापडत नव्हता. खाली बघितले तर पायथ्याशी गावातील टारगट पोरं जमली होती. आम्ही त्यांना वाट विचारली असता "वाघरू आले.. वाघरू आले" म्हणून घाबरवायला सुरुवात केली. तोपर्यंत प्रकाश कमी होण्यास सुरुवात झाली होती. शेवटी गडाचे नीट निरीक्षण करून एक मळलेली पाऊलवाट शोधून काढली अंधार पडण्याच्या आत पोहोचायचे उद्दिष्ट ठेऊन वाटेतले अवघड रॉकपैच पार करून एकदाचे दुर्गावर पोहोचलो.

जीवधन हा जुन्नर विभागातील एक दुय्यम किल्ला असून हा कोकणच्या तोंडावर उभा असल्याने
टेहळणीसाठी याचा वापर होत असे. नाणेघाट हा व्यापारी दृष्ट्या महत्वाचा असल्यामुळे त्याचा रक्षणासाठी असलेल्या जीवधन ला सुद्धा महत्व आले. शहाजी महाराजांनी एक काळ मुर्तजा या बालवयीन निजामशहाला हाताशी धरून जीवधन किल्ल्याच्या मदतीने आदिलशहाच्या सेनेशी लढा दिला होता. गडाला केवळ दोनच वाटा आहेत.बाजूचा वानरलिंगी सुळका प्रस्तरारोहणासाठी प्रसिद्ध आहे. पश्चिमेकडे नाणेघाट नानाचा अंगठा, पूर्वेस जुन्नरपेठ, उत्तरेस भोरांड्याची नळी दक्षिणेस उभा कडा आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळचे दोन तास स्वहस्ते चुलीवर न्याहारी करण्यात दवडले. पुढचा मोठा पल्ला गाठायचा असल्याने आवराआवर करून निघालो. येथून आमच्या पायपिटीला सुरुवात झाली. पूर्वेच्या वाटेने चढल्यामुळे आम्ही उतरायला पश्चिमेची चोर दरवाज्याची वाट घेतली. निम्मा गड उतरल्यावर आमची पुढची वाट खुंटली. चरफडतच पुन्हा चढून गडावर आलो. पुन्हा चढलेल्याच वाटेने उतरलो.

नाणेघाटात पोहोचण्यासाठी आता निम्म्या गडाला वळसा घालून जावे लागणार होते. टळटळीत उन्हातून तेथे पोहोचण्यास तास-दीड तास लागला. नाणेघाटात कोरलेले प्राचीन शिलालेख (ब्राह्मी लिपी) बघितले. नाणेघाट हा कोकणात उतरण्यासाठी पूर्वीपासून वापरात असलेला रस्ता आहे. याची निर्मिती सातवाहन राजकुळाने ..पू. १०० - .. ३०० दरम्यान केली.

नाणेघाटाच्या वरील अंगाचा नानाचा अंगठा चढून कोकण कड्याचे दर्शन घेऊन
भोरांड्याच्या नळीच्या मार्गाला लागलो. उन्हातून चालताना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले. वाटेत कुठेही पाणी नसल्यामुळे जवळचे पाणी काळजीपूर्वक वापरायचे असल्यामुळे तहान भागवण्यासाठी वाटेतील करवंदाच्या जाळ्यातील कच्ची करवंद फुलं ओरबाडून खाऊ लागलो. बघता बघता भोरांड्याच्या नळीत शिरलो. अत्यंत अरुंद मळलेली वाट, पुरुषभर उंचीचे दगड ज्यावरून सतत उड्या मारत खाली उतरावे लागले. दोन अडीच तास उतरल्यानंतर सुद्धा सपाट प्रदेश लागत नव्हता. तोपर्यंत अंधार पडला. जरा वेळ शोधाशोध केल्यावर गाडी रस्ता सापडला. तो सापडल्यानंतर श्रमाने सर्वजण रस्त्यावरच आडवे पडले.सर्वांजवळचे पाणी संपले होते. पाण्याला अमृत का म्हणतात? हे आम्हाला तेव्हा कळले. कष्टाने तसेच उठून आम्ही मोरोशी या गावात पोहोचलो. गावाबाहेर नदीच्या पात्रात पाणी मिळाल्यावर जीव भांड्यात पडला. रात्री शाळा मंदिर सापडल्याने एका चावडीबाहेर मुक्काम केला. जेवणासाठी खिचडी तयार केली जाऊन लवंडलो.

तिसऱ्या दिवशी चहा/न्याहारी करून भैरवगडाला भिडलो. कठीण चढणीचा हा भैरवगड आदल्या दोन दिवसांच्या श्रमामुळे अजूनच अवघड वाटू लागला. भैरवगड हा टेहळणी करण्यासाठी वापरला जाणारा गड आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावरील नैसर्गिक डाईक अश्मरचनेवरील उभारणी आणि गडावर असणारं बारमाही पाण्याचे टाके. भैरवगडावरील ही नैसर्गिक रचना प्रस्तरारोहकांसाठी आव्हानात्मक असूनही दुर्लक्षित राहिली आहे. असा हा भैरवगड उतरून आम्ही मोरोशीस परतलो. तेथून खचाखच भरलेल्या एस.टी.तून कल्याणला आलो मग बदलापूरला लोकलने, तेथून दुसऱ्या लोकलने कर्जत आणि रात्रीच्या महालक्ष्मी एक्स्प्रेसने निघाल्याच्या चौथ्या दिवशी सकाळी दोन वाजता पुण्यात पोहोचलो.

पुण्यात पोहोचल्यानंतर सुटका झाल्याची भावना नव्हती तर ट्रेक व्यवस्थित पूर्ण केल्याचा आनंद होता. गेल्या ७० तासात रणरणत्या उन्हातून तहानेने व्याकूळ झालेलो असताना अनेकदा मनात विचार आला, की घरी बसलो असतो तर ही कटकट झाली नसती, पण कष्टाचा अनुभव घेतल्याशिवाय अडचणीतून गेल्याशिवाय सुख ( समाधान ) लाभत नाही. ह्या ट्रेकमध्ये आम्ही ते पूर्णपणे अनुभवले एक अवर्णनीय आनंद मिळाला. आज ट्रेकडी या साहसी पर्यटनाच्या संस्थेचे कामकाज बघताना त्या अनुभवांचा खूप फायदा होतो. शाळेत असताना एक कविता पाठ करायचो "बिनभिंतीची उघडी शाळा" ह्या नावाची. ती कविता आम्ही स्वतः जगलो.

पिनाकिन् कर्वे
९८२२४४४९६३
www.trekdi.com

Published in Sakal Lifestyle
Date: April 16 2011

No comments:

Post a Comment