September 6, 2010

माझा हरिश्चंद्र गड नाईट ट्रेक

मी डॉ सचिन आणि २५ मित्र यांनी पुण्यातील ट्रेकडी या गिर्यारोहण करणाऱ्या संस्थेत नाव नोंदवले होते. ट्रेकडी हि एक हौश्या नवश्या आणि तयार अशा गीरीप्रेमिंसाठी दुर्गभ्रमण करवणारी अतिशय उत्तम संस्था आहे. यांचे ऑफिस कर्वेनगर पुणे येथे आहे. www.trekdi.com ही त्यांची वेबसाईट आहे।याद्वारे ते लोक आपले नाव नोंदवतात आणि आपल्याला गिरीभ्रमंतीला नेतात. ही अतिशय उत्तम अशी संस्था आहे. सर्वांनी जरूर यांच्याबरोबर जावे असे मी सुचवीन.

दिनांक २७ मार्च रोजी मी व ट्रेकडी चे ३ शिलेदार पुण्याहून २.३० वाजता पुण्याहून हरिश्चंद्र गड सर करायला निघालो. आमचा मार्ग पुणे-आळेफाटा-बोटा-राजूर-कोतूळ-पचनी असा होता. या गडावर जाण्यासाठी ही सर्वात सोपी वाट आहे असे अनुभवी लोक सांगतात. ही वाट बघितल्यावर आमच्या तोंडचे पाणी पळाले ही गोष्ट निराळी. याव्यतिरिक्त अजून ७ वाटा आहेत असे पिनाकिन कर्वे नावाचा चतुर गिर्यारोहक आम्हाला म्हणाला .तो पुढे असेही म्हणाला कि खिरेश्वर गावातून जाणारी वाट ही अतिशय अवघड आहे. नळीची वाट म्हणून जी काही आहे त्याची कल्पनाच केलेली बरी असेही त्याने नमूद केले. मजल दरमजल करीत आम्ही २५ जणांचा गटाने गडाच्या पायथ्याशी सामान आपटले. आणि मग हॉटेल च्या पायर्यांवर बसून रात्री ९ वाजता गडाकडे पाहायला सरुवात केली. तोंडाला कोरड पडली आणि पोटात खड्डा पडला म्हणून आयोजकांनी गडावर गेल्यावर खायला जे जेवणाचे पाकेट दिले होते ते फस्त केले . आमचे अवसान यामुळे पूर्ण गाळले आणि काही मंडळी पुढे सरसावून म्हणाली कि इथेच टाका तंबू . रात्री झोपू आणि सकाळी पायथ्याशी फेरफटका मारू आणि घरी जावू. या मंडळींमध्ये मी सुद्धा होतो. गडाची उंचीच खूप आहे त्यामुळे आमच्यासारख्यांचे अवसान ग़ळाले नाही तरच नवल.

होय नाही म्हणता रात्री ९.३० वाजता पिनाकिन ने सगळ्यांना अवसान गोळा करायला लावून चढाई कशी करायची आणि काय करायचे नाही ते नेमके सांगितले.ते ऐकून आमची भंबेरी उडाली. काय वाढून ठेवले आहे ते दिसायला लागले. चतुर असा पिनाकिन म्हणाला कि जंगलात बिबट्या , कोल्हे असतात. हे आम्ही ऐकले न ऐकल्यासारखे केले . करणार तरी काय हो?

मग चंद्रप्रकाशात टोर्च घेऊन सगळे चढू लागलो. छान शांत शीतल वातावरणात ट्रेक करायला खूप मजा आली. मधेच कोल्हेकुई ऐकू येत होती . चांगल्या २-४ लिटरच्या बिसलेरी रिचवून आणि गोळ्यांची पाकिटे फस्त करत आणि तारेवरची कसरत करत , धापा टाकत आम्ही २ तासांनी गडावरच्या हरीश्चान्द्राच्या देवळात पोचलो. तिथे गेल्यावर आम्हाला आमची लाज वाटली. शिवाजी महाराजांच्या काळात ही मराठे मंडळी गडावर चढून लढाई कशी करत असतील ? असा आम्हाला प्रश्न पडला आणि अचंबा वाटला. मग हा विचार करत आम्ही सगळे कोंडले करून बसलो आणि शिदोर्या उघडल्या व पोटभर चापून खाल्ले . पोटावरून हात फिरवत असे ट्रेक आपण नेहमी केले तर वजन नक्की कमी होईल असा एक छोटा परिसंवाद घेतला.

गडावरील शंकराचे दर्शन घेऊन मग आम्ही थकल्या पायांनी उजवीकडे असलेल्या गणेश गुहेत सामान गेलो. ही एक अतिशय पावन , शांत , निर्मल, शीतल अशी जागा आहे. येथे झोपण्याची सोय आहे . शेजारीच शुद्ध गोड्या पाण्याची नैसर्गिक सोय आहे. मग आम्ही पथारी पसरली तेव्हा रात्रीचे १२ वाजले होते. स्वच्छ चंद्रप्रकाशात गड अतिशय मनमोहक दिसत होता. थकल्या मनाला आणि शरीराला तिथल्या आल्हाददायक हवेमुळे तरतरी आली.

श्री अभिजित येवले हे दुसरे तरुण तडफदार शिलेदार पुढे सरसावले. त्यांनी सगळ्यांना सांगितले कि आता ( रात्रीचे १२.३० वा.) आपल्याला कोंकण कडा रात्रीच्या उजेडात पाहायला जायचे आहे. खरा सांगू का मला या उत्साही वातावरणात यामुळे खरच खूप उत्साह आला आणि मी ताजातवाना होऊन त्या ग्रुपबरोबर हातात टोर्च घेऊन बाहेर पडलो . साधारण अर्धा तास दगडातून वाट काढत आम्ही तेथे पोहोचलो. हा कोंकण कडा म्हणजे डोळ्याचे पारणे फेडतो हो. इंग्रजी सी आकाराचा हा दगडी कातळ कोरून काढल्यासारखा दिसतो . साधारण १४०० फूट याची उंची आहे. अतिशय मनोरम असे हे दृश्य होते. हवाही शीतल आणि छान पडली होती त्यामुळे तेथे बसायला खरच छान वाटत होते. मग पिनाकिन ने आम्हाला या काड्याची माहिती सांगितली . ती ऐकता ऐकता कधी रात्रीचे १.३० वाजले ते कळलेच नाही.ते सुंदर दृश्य आमच्या मनात ठेवून आम्ही परत गणेश गुहेत परतलो.

सकाळी छान पक्ष्यांच्या किलबिलाटाने ६ वाजता जग आली.नाहीतर रोज आम्ही मोबाईल च्या गजराने उठणारी माणसे. खूप छान वाटले. मग फ्रेश झाल्यावर मस्तपैकी गावठी चहा आणि पोहे खाऊन आम्ही तारामती शिखर बघायला निघालो . हि एक अतिशय सुंदर चढण आहे. या मध्ये एक दगडी चढाव असून तो अभिजित मुळेच मी चढू शकलो..वर गेल्यावरचे दृश्य अतिशय सुंदर होते. सर्व बाजून सह्याद्रीचे कडे आणि त्यातून जाणारा माळशेज घाट आणि नाणेघाट . हडसर वगैरे किल्ले आम्ही वरून दुरून बघितले. बराच वेळ तेथे घालवून आम्ही खाली देवळापाशी उतरलो. बरेच थकलो होतो पण मंदिरातील थंड पाण्याने मन प्रसन्न झाले. हे करताना १ वाजला मग आम्ही खाली उतरायची तयारी करून उतरू लागलो. खाली उतरताना आमचा कस लागला , पाय मी म्हणू लागले.

२ तासांनी आम्ही खाली उतरलो तेव्हा मात्र पूर्ण शक्तिपात झाल्यासारखे वाटले. पायथ्याशी असलेल्या हॉटेल मध्ये विहिरीच्या थंड पाण्यानी फ्रेश झाल्यावर जीवात जीव आला. लगेच ऑर्डर दिली आणि मग भाकरी पिठल्याचे जेवण आले. असगाल्यांनी ताव मारला आणि परतीच्या प्रवासाठी बसमध्ये बसलो. रात्री १० वाजतो घरी पोचलो ते पुढचा ट्रेक लवकर करायचा या निश्चयाने !

एक मात्र झाले मला खूप वेगवेगळय क्षेत्रातले दोस्त मिळाले. माझा वेळ सत्कारणी लागले असे वाटले. माझी शारीरिक क्षमता यामुळे वाढली आणि भविष्यात वाढेल असे वाटते.

ट्रेकडी च्या पिनाकिन , अभिजित, निनाद यांचे मनापासून आभार त्यांच्या मुळे हे ट्रेकिंग चे धाडस मी करू शकलो.

- डॉ सचिन कुबेर
हरिश्चान्द्रागड नाईट ट्रेक
२७ - २८ मार्च २०१०